पर्यावरण हाच जीवनाचा मूळ आधार आहे. मानवाने पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण केले तरच पर्यावरण आपले करेल हा निसर्गाचा मुलभूत नियम आहे. मानवाची गेल्या काही दशकातील वाटचाल पहिली तर हा नियम धाब्यावर बसवून मानवजात स्वतःचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे अतोनात नुकसान करीत आहे असे दिसते. प्रबोधनातूनच समाज परिवर्तन होते हे भारतीय संत महात्म्यांनी त्यांच्या आचरणातून वारंवार सिध्द करून दाखवले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली देहू-आळंदी ते पंढरपूर वारी हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. शेकडो वर्षे पर्यावरणस्नेही असलेली वारी गेल्या काही वर्षात बरीच बदलेलेली आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेस आणि प्लेट्स यांचा अनिर्बंध वापर हा ठळक आणि विघातक बदल. वारीच्या दरम्यान आणि वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने होत असलेल्या प्लास्टिक, थर्माकोल यांच्या प्लेट्स, डिशेस यांच्या प्रचंड वापरामुळे शेती, जमीन, पाणी आणि पर्यावरण साखळी यांचे दीर्घकालीन नुकसान होते आहे. आजवर झालेली हानी भरून काढण्यासाठीच शेकडो वर्षे लागतील एवढे हे भीषण संकट आहे.
जे-जे अमंगल, अनिष्ट त्यावर वार करून, त्याच्या जोखडातून स्वतः मुक्त होणे आणि त्यासाठी समाजाचे प्रबोधन करणे हे कार्य वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षे केले आहेच. सांप्रतकाळी प्लास्टिक आणि थर्माकोल प्लेट्स, डिशेस यांच्या रूपाने शेकडो वर्षे जिवंत राहणारा भस्मासुर वारीमध्ये शिरला आहे. दिवसें-दिवस तो आपले पाश आवळत चालला आहे. आपले आणि येणाऱ्या आपल्याच पिढ्यांचे या भस्मासुरापासून रक्षण करण्यासाठी आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी वारकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांचे प्रबोधन संतानी घालून दिलेल्या मार्गाने करणे हाच एकमेव रामबाण उपाय आहे.
देहू-आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांचे प्रबोधन आजवर केले गेले आहे. वारकरी हा मुळातच शेतकरी आणि निसर्गावर अवलंबून असल्याने पर्यावरण संवर्धन हे त्याच्या रक्तातच असते. प्लास्टिक आणि थर्माकोल मुळे पर्यावरणाची हानी होते हे समजल्यानंतर नैसर्गिक पानांच्या पत्रावळी जेवणासाठी वापरण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. थं क्रिएटिव ने गेल्या काही वर्षात हाती घेतलेल्या प्रबोधन, जनजागरण मोहिमेचे हे मोठे यश आहे. या उपक्रमात विविध दिंड्यांचे प्रमुख, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, माध्यमे, समाजसेवक यांचेही सक्रीय सहकार्य लाभत आहे.
आजचा विद्यार्थी हा संवेदनशील, संस्कारक्षम नागरिक आहे. निकट भविष्यात देशाची सूत्रे हाती घेणाऱ्या या कार्यशील तरुण पिढीला पर्यावरण रक्षणाचे महत्व आताच पटवून देणे ही काळाची गरज आहे. थं क्रिएटिव ने वारी मार्गातील गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये जाऊन तरुण विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आजवर एक लाख विद्यार्थ्यांनी प्लास्टिक, थर्माकोल यांचा कमीतकमी वापर करण्याची शपथ घेतली आहे. थं क्रिएटिव च्या भविष्यातील उपक्रमाचे शिलेदारही यातून घडले जात आहेत. आपल्या घरी आणि गावात पर्यावरण संवर्धनाचा संदेश हे विद्यार्थी प्रभावीपणे घेऊन जात आहेत.
प्लास्टिक, थर्माकोल कचरा आणि त्यापासून होणारे घातक प्रदूषण ही समस्या केवळ वारीच्या दरम्यानची नसून वर्षभरातील आहे. गावांमध्ये, शहरांमध्ये राहणारे नागरिक असा कचरा वर्षभर निर्माण करत असतात. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू कमीतकमी वापराव्यात आणि त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानमाला, चर्चासत्रे, प्रदर्शने, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी या सर्व माध्यमांचा प्रभावी वापर यासाठी केला जातो. थं क्रिएटिवचे संस्थापक श्री प्रशांत अवचट यांनी आजवर पाचशेहून अधिक व्याख्याने यासाठी दिली आहेत.
निसर्ग वारी उपक्रमाचे प्रणेते आणि थं क्रिएटिव चे संस्थापक श्री प्रशांत अवचट यांची दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेली मुलाखत
Copyright 2023 | All rights reserved | Nisarg Wari