निसर्गवारी २०२२ फोटो गॅलरी

थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि रोटरी क्लब, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव पाटी, ता. माळशिरस येथे 6 जुलै रोजी विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये वारी मध्ये सहभागी असलेले दिंडी मालक, चालक, अन्नदाते आणि वारकरी यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला आणि पर्यावरण संरक्षण तसेच पाणी बचतीसाठी नैसर्गिक पानांच्या पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करण्याचे आवाहन केले. या मोहिमेत एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधील 90 विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी गट तयार करून वारकरी आणि दिंडी चालक मालक यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याही अडचणी, समस्या समजावून घेतल्या. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. श्री करांडे सर , उपप्राचार्य श्री कुलकर्णी सर, प्रा. शेंडे सर आणि रा. से. यो मधील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

पंढरपूर येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मध्ये येथील विद्यार्थ्यांसाठी “पाणी बचत, पर्यावरण संरक्षण तसेच आरोग्यासाठी नैसर्गिक पत्रावळी, द्रोण यांचा वापर” या विषयावर व्याख्यान, सादरीकरण आणि कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यायातील सुमारे 100 विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख आणि प्राचार्य यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशन यांच्या वतीने पालखी सोहळ्यात दिंडी चालक, मालक तसेच अन्नदाते यांचे प्रबोधन एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजनिअरिंगचे विद्यार्थी करणार आहेत. त्यांचे प्रशिक्षणही या कार्यक्रमात घेण्यात आले.

प्लॅस्टिक थर्माकोल कचरा आणि प्रदूषण मुक्त वारी कशी साजरी करावी या विषयी मार्गदर्शन करणारे व्याख्यान सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर येथे संपन्न झाले. पर्यावरण रक्षण, पाणी बचत तसेच आरोग्य यासाठी प्लॅस्टिक, थर्माकोल प्लेट्स ऐवजी नैसर्गिक पानांच्या पत्रावळी वापरण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आहे.शेवटी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. या प्रसंगी शाळेतील 2000 विद्यार्थी उपस्थित होते.

अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे प्लॅस्टिक थर्माकोल कचरा मुक्त वारी अभियानाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यक्रमाचे संवादी स्वरूप यामुळे अनेक विद्यार्थिनींनी अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विभागप्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

1893 सालापासून उज्वल शैक्षणिक परंपरा जपणाऱ्या फलटण शहरातील मुधोजी हायस्कूल मध्ये प्लॅस्टिक थर्माकोल कचरा मुक्त वारी अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संरक्षण आणि पाणी बचतीसाठी प्लॅस्टिकचा वापर सर्वच ठिकाणी कमीत कमी करण्यात यावा आणि भोजनासाठी नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या द्रोण पत्रावळी यांचा वापर व्हावा ही बाब विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आली. प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यात विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग असावा यासाठी त्यांना इको ब्रिक्स तयार करण्याचा उपक्रम देण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि उपक्रमात सक्रिय सहभाग देण्याचे उत्साहाने मान्य केले. शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक यांचे अनमोल सहकार्य या कार्यक्रमास लाभले.

फलटण शहरातील यशवतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या दोन संस्थांमध्ये व्याख्यान आणि प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरण संरक्षण आणि पाणी बचतीसाठी नैसर्गिक पानांपासून बनलेल्या द्रोण पत्रावळी यांच्या वापरास चालना देण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पर्यावरण संरक्षण, पाणी बचत आणि प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करण्याची शपथ देण्यात आली. पारंपरिक भारतीय वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची दिंडी फलटण शहरातून काढण्यात आली. पर्यावरण संरक्षण, पाणी बचत, वृक्षारोपण या विषयीच्या घोषणा, गाणी यांनी फलटण शहर दुमदुमून निघाले.

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील अकलूज हे एक महत्वाचे स्थान आहे. अकलूज शहर आणि परिसरातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध शाळा म्हणजे सदाशिवराव माने विद्यालय. या शाळेत एकूण साडेतीन हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी शिकतात. या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र, एका छत्राखाली संबोधित करण्याची संधी मिळाली. विषय होता अर्थातच “पर्यावरण संरक्षण, पाणी बचत, प्लॅस्टिक थर्माकोल प्रदूषण आणि नैसर्गिक पानांच्या पत्रावळी द्रोण यांचा वापर करण्यास उत्तेजन.

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. माधुरीताई राजेंद्र काळभोर आणि ग्रामपंचायतचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामसेवक, अधिकारी आणि कर्मचारी, स्वच्छ्ता सेवक या सर्वांना निसर्गवारी अभियानासोबत जोडून घेतले. त्यांना प्लॅस्टिक थर्माकोल प्रदूषण कचरामुक्त वारी सोहळ्याची “निसर्गवारी शपथ” दिली.

जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय हे अकलूज शहर आणि परिसरातील प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र. या ठिकाणी “पर्यावरण संरक्षण, पाणी बचत, प्लॅस्टिक थर्माकोल प्रदूषण आणि नैसर्गिक पानांच्या पत्रावळी द्रोण यांचा वापर करण्यास उत्तेजन” या विषयावर 1100 विद्यार्थिनीचे प्रबोधन केले. महाविद्यालयाच्या खुल्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थिनी, प्राचार्य आणि शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थिनी आणि शिक्षकांना पर्यावरण संरक्षण, पाणी बचत आणि प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तूंचा त्याग करण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रम सफल करण्यास शाळेचे प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

फलटण मधील आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात एक अनोखा संवाद रंगला होता. निमित्त होते पर्यावरण संरक्षण आणि पाणी बचतीसाठी नैसर्गिक पानांच्या पत्रावळी यांच्या वापरास उत्तेजन देण्याच्या व्याख्यानाचे. विद्यार्थी विद्यार्थिनींचा अपूर्व उत्साह पाहून नेहमीप्रमाणे व्याख्यान न देता प्रश्नोत्तरे आणि मुक्त संवाद असे कार्यक्रमाचे स्वरूप ठेवले गेले. थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच चे संस्थापक श्री प्रशांत अवचट यांनी पर्यावरण आणि पाणी बचत हा धागा पकडून विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवादाला सुरुवात केली. काही क्षणातच कार्यक्रमाला “पर्यावरण गप्पा” असे स्वरूप प्राप्त झाले. पर्यावरण, पाणी बचत, प्लॅस्टिक प्रदूषण आणि विशेषतः नैसर्गिक द्रोण पत्रावळी यांचा वापर यांविषयी विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने अनेक प्रश्न विचारले. त्यांची समर्पक उत्तरेही त्यांना मिळत गेली.
वारी मध्ये भोजनासाठी नैसर्गिक पानांच्या पत्रावळी यांचा वापर जास्तीत जास्त व्हायला हवा हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याचा निर्धार विद्यार्थी, विद्यार्थिनींनी केला. यासोबत टाकाऊ प्लॅस्टिक कचरा आणि पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटलीचा वापर करून जास्तीत जास्त इको ब्रिक्स तयार करून त्या शाळेत जमा करण्याचाही निर्धार विद्यार्थी विद्यार्थिनींनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षिका यांचे सहकार्य लाभले

पंढरपूर पासून 12 किमी अंतरावर भंडी शेगाव हे लहानसे गाव आहे. या ठिकाणी सर्व प्रमुख पालख्या एकत्र येतात आणि पंढरपूरच्या दिशेने एकत्र प्रयाण करतात. त्यामुळे सर्व दिंड्यांमधिल आठ ते दहा लाख वारकरी अधिक परिसरातील लाखो भाविक इथे येतात. यामुळे या लहान गावाच्या सर्वच व्यवस्थांवर मोठा ताण येतो. विशेषतः प्लॅस्टिक थर्माकोल प्लेट्स यांचा प्रचंड कचरा आणि लाखो लोकांना पाणी पुरवठा करणे हे मुद्दे अधिक महत्त्वाचे आहेत. हा ताण सुसह्य करण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षण, पाणी बचत आणि मानवी आरोग्य यासाठी नैसर्गिक पानांच्या पत्रावळी वारीमध्ये भोजनासाठी वापरणे हा एकमेव आणि सहजशक्य उपाय आहे. याविषयी भंडी शेगावच्या सरपंच सौ. अर्चना यलमार यांच्याशी संवाद साधला. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्रामसभेत या विषयीचे मुद्दे संमत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

लोणंद शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांसोबत एक अनौपचारिक बैठक श्री राजेश मर्दा यांच्या दुकानात पार पडली. शहरातील हे प्रमुख व्यापारी वारी दरम्यान अन्नदान आणि इतर सेवा उपक्रम राबवत असतात. अन्नदान करताना प्लॅस्टिक, थर्माकोल प्लेट्स यांच्या वापरामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीविषयी त्यांना अवगत करण्यात आले. पाण्याची, आरोग्याची आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इथून पुढे नैसर्गिक पानांच्या पत्रावळी आणि द्रोण वापरण्याचे या व्यापारी बंधूंनी ठरवले आहे