वारी म्हटले की डोळ्यांसमोर चित्र उभे राहते ते टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत गात पंढरीच्या दिशेने निघालेला वारकऱ्यांचा महामेळा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी एकाच ओढीने एकाच दिशेने भारल्यासारखे एकवीस दिवस चालत असतात. काही घराण्यात पिढ्यानपिढ्या वारी करण्याची परंपरा आहे. वारीचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध असते. मुक्कामाच्या जागा, भोजन व्यवस्था, दिंड्यांचा क्रम, पूजाउपचार सगळे काही आखीव रेखीव. गेल्या काही वर्षात संपर्काची माध्यमे, वाहतुकीची साधने आणि वाढलेली सधनता यामुळे वारीतील वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
एकविसाव्या शतकातील जीवनाची आधुनिकता वारीने सहजपणे स्वीकारली त्यामुळे बऱ्याच बाबी सुकर झाल्या पण काही गंभीर समस्यासुद्धा त्यामुळे निर्माण झाल्या आहेत. त्यातील प्रमुख समस्या म्हणजे प्लास्टिक आणि थर्माकोलच्या प्लेट्स आणि डिशेसमुळे होणारे जमीन, पाणी यांचे प्रदूषण, त्यांच्यामुळे जनावरांच्या जीवाला उदाभाणारा गंभीर धोका
दिंड्यांचा मुक्काम हलला की मागे उरतात ते टनावारी प्लास्टिक आणि थर्माकोल यांच्या वापरून फेकून दिलेल्या डिशेस, प्लेट्स यांचा कचरा. हा कचरा उचलणे, त्यांची विल्हेवाट लावणे हे स्थानिक ग्रामपंचायती, नगरपालिकांच्या आवाक्याबाहेरील काम आहे. पालख्यांचा मुक्काम बहुतेककरून गावाबाहेर माळरानावर असतो. इतस्तः पसरलेला हा कचरा वाऱ्याच्या झोताबरोबर रानोमाळ पसरतो. विहिरीत जाऊन पडतो. कालांतराने जमिनीत वरच्या थरात गाडला जातो. प्लास्टिक, थर्माकोल, प्लास्टिकच्या पिशव्या शेकडो वर्षे गेली तरी विघटन पावत नाही त्यामुळे वारी मार्गावरील गावांमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोल यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विळखा दरवर्षी घट्ट होत चालला आहे. या प्लेट्स आणि डिशेश मध्ये बऱ्याच वेळा उरलेले अन्नपदार्थ, पिशव्यांमध्ये पान फुल वगैरे निर्माल्य तसेच असतात. गाई, म्हशी यासारखी जनावरे ते पिशव्यांसकट खातात. या पिशव्या पोटात गेल्यामुळे हजारो जनावरे दरवर्षी मृत्युमखी पडतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही जण त्याचे पर्वतप्राय ढीग पेटवून देतात. त्यातून हवेचे प्रदूषण करणारे विषारी वायू पर्यावरणात सोडले जातात. गरमागरम पदार्थ प्लास्टिक थर्माकोल डिशेसमध्ये वाढल्यामुळे त्यातील विषारी रसायने अन्नात उतरतात. त्यामुळे खाणाऱ्याना कॅन्सरचा धोका, वापरल्यानंतर कचरा तसाच सोडून दिला तर जमीन पाणी यांचे शेकडो वर्षे राहणारे प्रदूषण, जाळला तर हवेचे प्रदूषण असे कितीतरी धोके प्लास्टिक आणि थर्माकोल वापरातील आहेत.
लाखो वारकरी आणि आसपासच्या गावातील हजारो भक्त यांचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, चहा यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोलच्या डिशेस, प्लेट्स, ग्लासेस तसेच पान-फुल, प्रसाद नेण्यासाठी आणि नंतर तिथेच टाकून दिल्या जाणाऱ्या लाखो कॅरीबॅग्स यांचा एकवीस दिवसांच्या वारीच्या काळात एकूण किती कचरा होत होत असेल याचा केवळ अंदाज बांधला तरी अंगावर शहारे येतील. हा कचरा शेकडो वर्षे विघटन होत नसल्याने निसर्गाची किती हानी होत असेल याची कल्पना येईल. हे दुष्टचक्र असेच काही वर्षे सुरु राहिले तर वारीमार्गावर असलेल्या गावांमध्ये किती भीषण अवस्था ओढवेल याचा अंदाज बांधता येईल..
पर्यावरण हे आपल्याला मागच्या पिढीने दिलेला अनमोल वारसा आहे आणि तो आपल्याला पुढच्या पिढीला सुस्थितीत हस्तांतरित करायचा आहे. मात्र आपण सर्वच जण पर्यावरणीय ऱ्हासाकडे अत्यंत वेगाने निघालो आहोत. भविष्यात भीषण संकटाना सामोरे जाण्याऐवजी आताच वेळीच सावध होऊन या संकटावर मात करता येणे शक्य आहे. त्यासाठी प्लास्टिक आणि थर्माकोल सारख्या विघातक पदार्थांचा वापर केवळ वारीतच नव्हे तर वर्षभर सुरु असलेल्या समारंभात सुद्धा होऊ नये याचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे.
‘प्रबोधनातून समाज परिवर्तन’ हा संतांचा मूलमंत्र आहे. संतानी घालून दिलेल्या मार्गानेच या संकटावर मात करता येईल या विश्वासातून ‘थं क्रिएटीव पर्यावरण दक्षता मंचाने’ गेल्या सहा वर्षात वारीमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. या कामात संप्रदायातील अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, दिंडीप्रमुख आणि वारकरी बंधू भगिनींचे यांचे सक्रीय सहकार्य लाभले आहे.
केवळ प्रबोधन करून हा प्रश्न सुटणार नाही तर त्याला पर्यायी व्यवस्था सुद्धा निर्माण केली पाहिजे यासाठी परंपरागत पद्धतीने तयार केलेल्या पानाच्या पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. पत्रावळी आणि द्रोण पुरेश्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी उत्पादक, ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते यांची साखळी निर्माण करण्यावर थं क्रिएटीव ने भर दिला आहे. वारीमध्ये पत्रावळी आणि द्रोण सवलतीच्या दारामध्ये दिंड्यांना उपलब्ध करून देण्यासाठीही थं क्रिएटीव प्रयत्नशील असते. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थाना या अभियानामध्ये सहभागी करून घेतले आहे.
पारंपारिक द्रोण पत्रावळी निसर्गाचाच एक भाग आहेत. त्यांची विल्हेवाट लावणे अतिशय सोपे आहे. त्यांचे विघटन काही दिवसातच आपोआप होते आणि त्यांच्यापासून उत्तम दर्जाचे काम्पोस्ट खत निर्माण होते. शिवाय साल वृक्षाची व्यापारी लागवड ते द्रोण पत्रावळी यांचे उत्पादन आणि विक्री यातून हजारो लोकांना रोजगारही मिळतो.
द्रोण आणि पत्रावळी यांचा वापर फक्त वारीमाध्येच न करता वर्षभर गावांमध्ये, शहरांमध्ये होत असलेल्या घरगुती आणि समाजिक समारंभातूनही व्हावेत यासाठी वेगवेगळ्या मार्गाने थं क्रिएटीव जनजागृती करते आहे. पारंपारिक द्रोण आणि पत्रावळी यांच्या वापरला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणे हाच प्लास्टिक, थर्माकोल कचरा आणि प्रदूषण यावरचा सहज, सोपा रामबाण उपाय आहे.
Copyright 2023 | All rights reserved | Nisarg Wari