थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच संचालित प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान (निसर्गवारी २०२३)

एक पंगत पत्रावळी दान देण्याचे आवाहन

Reg No. MAH/ 1744/Pune, Public Trust Reg No. F47794/ Pune, PAN: AAEAT7357A

रामकृष्ण हरी!

समाज प्रबोधन करण्यासाठी आणि परमेश्वरावरील विश्वास दृढ करण्यासाठी संतानी दिंड्या सुरु केल्या. दिंडीची अविरत परंपरा आपण सर्वांनी पिढ्यान-पिढ्या चालवली आहे. मानवाचे वा निसर्गाचे आयुष्य वाढविण्यासाठी म्हणजेच चराचराचे रक्षण व्हावे या हेतूने संतानी आपले कार्य केले. संतांच्या अनेक रचनांमध्ये याचा आपणास परिचय येतो. बदलत्या परिस्थितीत दिंड्यांमधील वारकऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याचप्रमाणे वीस पंचवीस वर्षांपूर्वी दिंडीमध्ये एकही प्लास्टिकची पिशवी, थर्माकोलचे ताट वापरले जात नव्हते. पण आज वारीमध्ये प्लास्टिक-थर्माकोल प्लेट्स, सिल्व्हर कोटिंग असलेल्या प्लेट्स यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामुळे आज दिंडी पुढे निघून गेल्यानंतर त्या गावामध्ये अक्षरशः टनांमध्ये मध्ये प्लास्टिक, थर्माकोल कचरा पसरलेला असतो. प्लास्टिक, थर्माकोलचा हा कचरा निसर्गचक्रात विघटन पावत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे हा कचरा तसाच राहतो आणि मार्गावरील शेतांमध्ये, पाणवठ्यामध्ये विखुरला जातो. त्याचे दीर्घ परिणाम निसर्गचक्रावर होऊ लागले आहेत. काही दिंड्यांमध्ये भोजनासाठी स्टीलची ताटे वापरली जातात पण हजारो खरकटी ताटे धुण्यासाठी दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जाते. वारीमार्गात सर्वत्र टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जाते. मुळात या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असताना ताटे धुण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय करणे योग्य नाही.

संतांनी सांगितलेल्या विचारधारेप्रमाणे पर्यावरणाचे आणि जीवसृष्टीचे संरक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे तरच आपण सुखी होणार आहोत. याच तत्वाला अनुसरून गेली तेरा वर्षापासून वारी मार्ग कचरा मुक्त व्हावा यासाठी आम्ही प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त वारी (निसर्गवारी) हे अभियान राबवतो आहोत. या अभियानात श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थान यांचाही सहभाग आहे.

या सकल विश्वाच्या प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी माऊलींनी पसायदानामध्ये ‘जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात’ अशा पद्धतीचे एक मागणं केलेलं आहे. यातून मानवाबरोबर प्राणिमात्रांच्याही कल्याणाचा कळवळा प्रकट झाला आहे. सकल जीवितांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी जल वायू आणि जमीन अर्थात पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी वारीमध्ये पर्यावरण पूरक निसर्गनिर्मित पानांच्या पत्रावळी वापरणे गरजेचे आहे. यामुळे वारकरी, वारीमार्गावरील गावकरी, भटकी जनावरे, जमीन, पाणी या सर्वांचेच आरोग्य जपले जाणार आहे. वारीमध्ये अन्नदान करणे हे महत पुण्याचे काम समजले जाते पण हे दान तेंव्हाच सत्कर्म समजले जाईल आणि त्याचे अनेक पटीने पुण्य मिळेल जेंव्हा ते निसर्गनिर्मित, पर्यावरणपूरक पात्रातून म्हणजेच पानांच्या पत्रावळी, द्रोण यांच्यामधून दिले जाईल. यासाठी आम्ही आपणास आवाहन करतो आहोत की आपण किमान एक पंगत पत्रावळींची द्यावी, अर्थात एक पंगत म्हणजे पाचशे लोकांसाठी लागणारी पत्रावळी दान करावी. याची किंमत मात्र एक हजार रुपये आहे. आपल्या या दानामुळे लेकुरवाळ्या विठ्ठलाची हजारो लेकरे आरोग्यदायी, पर्यावरणपूरक पत्रावळींमध्ये भोजन करतील. वापरलेल्या या पत्रावळीं आम्ही संकलित करून त्यांचे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करणार आहोत. हे खत वारीमार्गातील शेतकऱ्यांना मोफत वितरित केले जाते. या उपक्रमामुळे वारीमार्गावरील कचऱ्याचा प्रश्न शून्यावर येणार आहे. आमच्या या उपक्रमास आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा व वारकऱ्यांचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षण व संरक्षणासाठी सुरू असलेल्या या निसर्गवारीमध्ये आपणही सहभागी व्हावे ही विनंती. 

आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI द्वारे पेमेंट करू शकता. आपण दिलेल्या योगदानाची पावती आपल्या ईमेल आय डी वर पाठवण्यात येईल. धन्यवाद!